Skip to main content

तूच तुझी वैरीण

                  आज दुपारी कॉलेज वरून येताना एका ठिकाणी द्राक्षे विकत घ्यायला थांबले. द्राक्षांचा दर उतरत येत असल्याने मी ही पाडून दरात द्राक्षे मागितली .द्राक्षे विकणारी व्यक्ती या एक वयस्कर आजीबाई होत्या .उन्हाची धाप लागून त्यांना चक्कर येत होती.मी माझ्या बॅगेतली पाण्याची बाटली काढून त्यांना दिली.भर उन्हात सहन होत नसतानाही हे काम का करताय असा सहानुभूती पूर्वक प्रश्न त्यांना मी केला . "बाई पोटासाठी झिजावं लागतंय" अस त्या उत्तरल्या. कष्ट केल्याशिवाय तर आयुष्याला पर्याय नाही ,रोजीरोटीसाठी काम करणं हाच संसाराचा राहाटगाडगा यामध्ये नवल नाही पण, "आजी इतकं वय झालेलं असताना ,शरीराला झेपत नसताना का राबताय?" म्हणून विचारलं त्यावर त्या म्हणाल्या "जगत आहे तोपर्यंत माणसाने कामात गुंतवून घेतलं पाहिजे ,आमचे मालक पोरग लहान असतानाच वारले ,एकट्या पोराला घेऊन आज इथवर आले ,इकडं तिकड काम करून त्याच शिक्षण अन लग्न करून दिल,त्याच्या जबाबदारी तुन निवांत झाले पण जगण्यासाठी दोन पैसे घरात आणले पाहिजेत,मी नाही कमवल तर सून घरात आयत देणार नाही .या वयात बाहेरची परवड होणार नाही ग,त्यापेक्षा बसून द्राक्ष विकली तर तेवढंच माझ्यासारख्या म्हातारीला दोन पैसे जास्त अन सुनेचे दोन शब्द कमी ऐकायला मिळतात." "आहो पन तुमचा मुलगा तरी तुम्हाला झेपत नसताना हे काम कस करून देतो?",त्या म्हणाल्या "घरखर्चाचा गाडा हाकताना त्याच्या नाकी नऊ येतात ,त्यात घरात ही माझ्यावरून सुनेमध्ये अन त्याच्यात किटकीट चालूच असते ,जास्त वाद नको म्हणून मी काम करून दोन पैसे नेते घरात,पुढचा संसार त्यांचाच आहे ,माझ तर नदीकाठी सरण भरायला चालू झाल,माझ्यामुळ सुनेची किरकिर अन त्यामुळं त्याच्या आयुष्याची राखरांगोळी नको इतकंच वाटत बघ!" मी त्या म्हणतील त्या दरात त्यांच्याकडून द्राक्ष घेतली अन घरी आले ,पण रात्री त्या आजींच्या विचाराने झोप लागेना . ज्या मुलाला जन्म दिला , आयुष्यभर ज्याच्यासाठी हाडाचे मनी अन रक्ताचं पाणी करून झिजल्या,आज घरात राहण्यासाठी त्याच्या बायकोला कमवून पैसे द्यावे लागत होते .खरंच म्हातारपण इतकं असह्य असत का ? नवरा गेल्यानंतर ज्या खंबीरपणे त्यांनी पोराला वाढवलं त्या पोराला ही आईची म्हातारपणी अशी परवड झालेली बघवतेच कशी? सुनेला घरात म्हाताऱ्या माणसाने आयते खाल्लेलं बघवेना पण चार दिवस सुनेच्या फेऱ्यात ती ही कधीतरी म्हातारी सासू होणारच की !याच जागी तिची आई असती तर ? या दोघीही स्त्रिया च ! पण किती विभिन्न पातळीवरच्या ! एकीने पुरुषानेच घरात कमवून आणायचं या विचाराला शह देऊन परिस्थिती समोर हतबल होऊन केवळ आपल्या पोटच्या मुलासाठी दुसऱ्याच्या घरी कामे करून त्याला शिकवलं तर दुसरीने दोन पैशासाठी शरीराला झेपत नसताना त्याच आईसमान सासूला दोन पैशासाठी उन्हात पाठवायला हयगय केली नाही .

                        पुराणातली सीता आणि हॅम्लेट ची आई या दोन विभिन्न स्त्रियांची प्रतिकृती या सून अन सासूच्या रुपात मला दिसत होती . एकवचनी ,एकपत्नी रामाने केवळ प्रजेचा राजा म्हणून सम्राज्ञी च्या जागी सीतेला बसवायचं असेल तर रावणाकडून जिंकून आल्यावर तिच्या पतिव्रतेची चाचणी घ्यायला हवी तर च ती सम्राज्ञी होण्यास योग्य अस म्हणून सीतेलाही नवऱ्याच्या कर्ताव्याखातर पतिव्रता सिद्ध करावी लागली,मागचा पुढचा विचार न करता ती तिने केली सुद्धा तर दुसरीकडे सत्तेच्या लालसेपोटी हापापलेल्या हॅम्लेट च्या आईने स्वतःच्या नवऱ्याला मारून टाकलं . किती हा विरोधाभास ! स्त्री जात एकच पण पुराणापासून आजपर्यंत उर्मिला,शर्मिष्ठा ,कैकेयी ,हॅम्लेटची आई,अन आजची स्त्री . परिस्थिती समोर सगळ्याच नतमस्तक ठरल्या. सीता असो नाहीतर हॅम्लेट ची आई ,पतिव्रतेसाठी कर्तव्यप्रिय पतीची मर्जी राखणे म्हणून इच्छा नसताना स्वतःच पतिव्रत्य सिद्ध करणे अन नवऱ्याच्या भावाच्या मदतीने सत्तेसाठी स्वतःच नवऱ्याचा खून करणे ,या ठरल्या पुराणातल्या अन पुस्तकातल्या गोष्टी ...पण आजच्या कलियुगात घराघरात चालणाऱ्या या गोष्टी म्हणजे सुनेने सासूला नावाला 'आई' हाक मारून तिच्या वयाचा ही मान न राखता उतारवयात तिची परवड करणे असो नाहीतर शिकलेली अन महत्वाकांक्षी सून घरात आणून तिच्या भवितव्याचा विचार न करता केवळ घराची अन वंशाची इब्रत राखण्यासाठी एक मूल होण्यास नवऱ्याला भरीस घालणे, तिच्या स्वप्नांचा विचार न करता घरकामात अन नवऱ्याच्या पाहुण्यांची उठबस करण्यातच जन्म घालवायला लावणारी सासू नणंद ...! याच स्त्री जातीला एकीकडे चळवळी अन आंदोलने करून समाजाला शह देणं शक्य झालं पण घरच्या परिस्थिती ला शह देताना तीच स्त्री जात तिला हतबल करायला समोर येऊन ठाकली हीच आजची वस्तुस्थिती !

-भक्ती पानसरे



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

काकस्पर्श

  मराठी चित्रपटांना cringe म्हणणाऱ्यांवर जबरदस्त चपराक मारणारा हा चित्रपट ! जसं की चित्रपटाच्या नावातच आहे काकस्पर्श ,नावावरून एक प्रचिती येते त्याप्रमाणे हिंदू धर्मात पिंडदानात दशक्रियेविधी दरम्यान कावळ्याच्या भूमिकेला जे महत्व आहे त्याचा संदर्भ असलेला हा चित्रपट आहे पण चित्रपट बघताना अगदी शेवटी महादेवच्या पिंडदाना वेळी झालेला काकस्पर्शाचा प्रसंग उमेचं पूर्ण आयुष्य दुःखाच्या खाईत कशा प्रकारे लोटून देतो सोबतच स्वातंत्र्य पूर्व काळात विधवा निराधार स्त्रियांची ,सन्मान सोडाच पण फक्त जगण्यासाठी झालेली ससेहोलपट या चित्रपटात जबरदस्त स्पष्ट रेखाटली आहे . चित्रपट पाहताना खरंच प्रश्न पडतो की आज स्त्रियांना समाजात समाजाकडून जे स्वातंत्र्य मिळालं आहे त्याचा इतिहास किती भयंकर आहे . अगदी 14-15 व्या वर्षी विधवा झालेली उमा , संपूर्ण आयुष्य न मिळालेल्या लैगिंक सुखाची अनुभीती नेमकी कशी असते ही भावना घेऊन शेवटी मरून जाते. स्त्रीच्या आयुष्यात नवरा नसेल तर तीच जगणं समाजाने किती हराम करून टाकलं होतं या उमेच्या भूमिकेला अभिनेत्री प्रिया बापट ने पूर्ण न्याय दिला आहे. पूर्वीच्या काळीच्या रितींनुस...

थरार

                   नेहमीसारखाच आजही व्यायामशाळेतून यायला उशीर झाला होता .व्यायामशाळेत जाण्यासाठी आम्हाला रोज परळीचा घाट पार करून सातारला जावं लागतं ,अंतर तस फार नाही अकरा किलोमीटर आहे पण रस्ता मात्र घाटाचा अन डोंगररांगांनी वेढलेला ! रात्री अपरात्रीच्या वेळी मुलीनी इतका वेळ घराबाहेर थांबू नये म्हणून घरची मंडळी सतत ओरडतात, पण निशु ताई अन मी काही आमच्या व्यायामाच्या वेळेत हयगय करत नाही. आमच्या ठरलेल्या वेळेत च म्हणजे साडे नऊ च्या दरम्यान घरी येतो . आजही सगळा व्यायाम उरकून , आरशात बघत शरीरयष्टी चे भारदस्त फोटो काढले. फ्रेश होऊन गाडीला किक मारली अन घरी यायला निघालो. व्यायामाने थकलेल्या शरीराला खूप भूक लागली होती , घरी लवकर पोहोचून गरमागरम ताटावर ठाण मांडायला मिळावं म्हणून गाडीचा वेग मी वाढवला होता . सुनसान अशा त्या आडबाजूच्या घाट रस्त्याला गाड्यांची वर्दळ फार नव्हती पण अंधारलेल्या समयी रातकिड्यांच्या कीर्र आवाजात भीतीदायक माहोल तयार झाला होता .वाटेत लागणाऱ्या उरमोडीच्या पुलाशेजारीच गावची स्मशानभूमी आहे .त्या पुलावरून ...

काहूर

                                                                                           अंधारलेली काळरात्र... सन्नाटा करणारा आवाज... गर्द झाडीतून ...रस्त्यावरून दमकणार्‍या काजव्यांचं लुकलुकणारं ते रूप... निरभ्र आकाशात शापित चांदण्यांचं राज्य, सूर्याचं साम्राज्य अस्त पावलं म्हणून जणू काही राजा चांदोबाच्या महालात वर्चस्व दाखवणाऱ्या दीड-दमडीच्या 'या' कुशलतेने पृथ्वीवर देखरेखच ठेवत होत्या ... असा हा सगळा प्रसंग असताना ,मी मात्र एक कवी ...काय बरं प्रासंगिक  कविता करणार या सगळ्यावर ?ऐन तारुण्यात बहरलेल्या यौवणावर प्रणयकाळाच्या कविता खरतर सुचायला हव्या होत्या, पण माझ्या मनात  एक भलतीच हुरहुर लागलेली लागलेली होती.निरभ्र आकाशातल्या या चांदण्या पाहून खरंतर प्रेम कविता करण्याचा मोह आज पर्यंत मला कधीच आवरला नाही पण आज... आज माझी मजल यांना शापीत म्हणण्यापर...