Skip to main content

थरार

                   नेहमीसारखाच आजही व्यायामशाळेतून यायला उशीर झाला होता .व्यायामशाळेत जाण्यासाठी आम्हाला रोज परळीचा घाट पार करून सातारला जावं लागतं ,अंतर तस फार नाही अकरा किलोमीटर आहे पण रस्ता मात्र घाटाचा अन डोंगररांगांनी वेढलेला ! रात्री अपरात्रीच्या वेळी मुलीनी इतका वेळ घराबाहेर थांबू नये म्हणून घरची मंडळी सतत ओरडतात, पण निशु ताई अन मी काही आमच्या व्यायामाच्या वेळेत हयगय करत नाही. आमच्या ठरलेल्या वेळेत च म्हणजे साडे नऊ च्या दरम्यान घरी येतो . आजही सगळा व्यायाम उरकून , आरशात बघत शरीरयष्टी चे भारदस्त फोटो काढले. फ्रेश होऊन गाडीला किक मारली अन घरी यायला निघालो. व्यायामाने थकलेल्या शरीराला खूप भूक लागली होती , घरी लवकर पोहोचून गरमागरम ताटावर ठाण मांडायला मिळावं म्हणून गाडीचा वेग मी वाढवला होता .

सुनसान अशा त्या आडबाजूच्या घाट रस्त्याला गाड्यांची वर्दळ फार नव्हती पण अंधारलेल्या समयी रातकिड्यांच्या कीर्र आवाजात भीतीदायक माहोल तयार झाला होता .वाटेत लागणाऱ्या उरमोडीच्या पुलाशेजारीच गावची स्मशानभूमी आहे .त्या पुलावरून जाताना एका सालात एक तरी बळी 'ती' घेतेच अशी दंतकथा ही प्रचलित आहे ,पण आमच्यासारखे विज्ञानाचे विद्यार्थी या दंतकथेला घाबरून रात्रीचा प्रवास करणे टाळू म्हणलं तर नवलंच ! कधीकधी डेरिंग दाखवण्यासाठी आयुष्यात असे प्रसंग यावेच लागतात याचा प्रत्ययच आज येताना आम्हाला आला .कारण ही काही तसच घडलं होत !
परळी गावच्या वेशीबाहेर सज्जनगड ची भली मोठी डोंगररांग उभी ठाकली आहे जणू या वसुमतीच्या तुकड्याने परळीला स्वतःच्या उदरात आश्रय दिला आहे .आजूबाजूचा भाग ,इथलं निसर्ग चक्र हे बरचस या डोंगरावर अवलंबून असत . या डोंगररांगेला वळसा घालून खाली उतरल की समोर उरमोडी धरणाची भली मोठी पसरलेली भिंत अन त्याखाली परळीच दर्शन घडतं . दक्षिणेला सज्जनगडच्या डोंगररांगेचा वेढा अन उत्तरेला तब्बल साठ गावांसाठी नेहमीच वरदायिनी ठरलेली 'उरमोडी' , असं हे माझं गाव ! परळी फाटा सोडून थोड्या अंतरावर आम्ही गेलो अन डोंगररांग पास करण्याच्या रस्त्याला लागलो . नेहमीचा रस्ता ,नेहमीची वेळ यामुळ रस्ता पाठ होता पण क्षणभरात अचंबित करणारी अन आयुष्यात पुस्तकी चित्रज्ञान सोडून खऱ्या धाडसाची परीक्षा देण्याची ती वेळ आली !खरंच ,तिसऱ्या वर्षाची "सत्र" परीक्षा पुस्तकी अभ्यास करून दिली पण आजची ही "सत्व" परीक्षा मृत्यूला गाठ घालून देणारी होती !
वळणाच्या अलीकडे गाडीचा वेग कमी होता तितक्यात गर्द झाडीच्या त्या डोंगरातून गाडीसमोर अचानक बिबट्या येऊन थबकला . क्षणात त्याची अन माझी नजरानजर झाली . त्याचे ते विलक्षण भावदर्शी डोळे , गाडीची हेड लाईट त्यावर पडल्याने प्रखरतेने अधिक क्रूर दिसत होते .अगदी काही सेकंदाचा तो अवधी ...! पिवळ्या रंगाचा तो उमदा , अंगावर काळ्या रंगाचे स्पॉट्स अन भारदस्त असा तो प्राणी म्हणजे पुस्तकातला "बिबट्या" पण आज तोच माझ्या समोर साक्षात समोर मृत्यू बनून आलेला . तो डाव्या बाजूने डोंगरातून गाडीवर झेप घेणार तोच काहीतरी हालचालीची भुणभुण लागल्याने मी वेग कमी केला होता म्हणून एक मीटरच्या अंतरावर ही नजरानजर झाली . गावाच्या या परिसरात शेतकऱ्यांना शेतात,लाकडे गोळा करणाऱ्याना जंगलात ,पहाटे फिरायला जाणाऱ्या मॉर्निंग वाँकर्स ना अशा प्रसंगांना बऱ्याचदा सामोरं जाव लागणाऱ्या कथा इकडून तिकडून गावच्या पारावर ऐकल्या होत्या पण बिबट्या समोर आला तर "मनोजवं मारुततुल्य वेगम" श्लोक म्हणायचा मग बिबट्या ही प्रत्युत्तरात"वदनी कवळ घेता" म्हणेल इतकाचा काय तो विनोदाचा भाग सोडून कधी आपल्याला या प्रसंगाला सामोरे जावे लागेल अन त्यासाठी संरक्षणपर विचार ही आजपर्यंत केला नव्हता पण आज त्या क्षणी विचार नाही तर गरज होती कृती करण्याची ! व्यायामशाळेतून भुकेजल्या पोटाने वेगात घरी निघालो होतो पण घरी जाण्याआधीच बिबट्याचं भक्ष्य बनायला आम्ही च त्याच्या ताटात मेजवानी बनणार होतो . सुख दुःख हेवे दावे हे सगळं काही क्षणात नाहीस झालं अन महत्वाचा वाटला तो जीव . हिंमत दाखवण्याची ही एकदा वेळ टळून गेली तर माझ्या जीवाला मी मुकणार होते. जिवाच्या आकांताने जीव वाचवण्याची माझी धडपड माझ्या नजरेतून तरळत होती. इतक्यात हार मानली तर माझ्या नावासमोर जन्मभराचा वाघाची शिकार झाल्याचा ठप्पा बसला असता, माझं जगून झालंय अस मी गृहीत धरलं आता माझं मरण माझ्या हातात आहे ते भिऊन घ्यायचं की दिमाखात त्याला सामोरे जायचं हे मला ठरवायचं होत. शिवकन्या, रणरागिणी अशा फक्त उपमा नावासमोर लावून घेणारी मी मराठी मुलगी नव्हे खऱ्याखुऱ्या वाघासमोर लढायचं म्हणजे त्याच्याच ताकतीच वाघिणीचं काळीज बनून लढायचं मी ठरवलं त्या सेकंदाच्या काही क्षणातच ! गाडीची ती बिबट्याच्या डोळ्यात पडणारी क्रूर वाटणारी हेड लाईट समोर ...मी.... अस ते समरांगण अन प्रेक्षक म्हणून आजूबाजूचा भयाण काळोख ...!
निसर्गाच्या नियमातच फक्त प्रतिकार करण्याऱ्याला अस्तित्व आहे .भविष्यात तोच टिकतो जो नाहीसे करायला आलेल्या परिस्थितीला शरण न जाता त्याच्याशी दोन हात करतो.आता मेले तरी बेहत्तर पण मरताना माझी कोणत्या प्राण्याने शिकार केलीये अन म्हणून विव्हळत माझा जीव जाणार हे अस मरण मला कधीही पसंद नव्हतं म्हणून मी लढायचं ठरवलं ... क्षणात बिबट्या हल्ल्यासाठी पुढे सरसावला , बिबट्याला प्रतिकार करण्याची माझ्या नजरेतली ती आग अन धडधडत्या उरातील हिम्मत घेऊन मी ही मागे हटले नाही . माझा तो रौद्रअवतार पाहून क्षणार्धात बिबट्याने त्याचा मार्ग वळवला अन उरमोडीच्या दिशेने गेला. पाठीमागून आलेल्या दोन चार गाड्यांची गर्दी जमत होती. आम्ही घरी येईपर्यंत बिबट्याच्या भेटीची ही वार्ता गावात पोहोचली होती ,कौतुकाने सगळ्यांनी माझी प्रशंसा केली ,आईने नजर उतरवली अन काही वेळात ही खबर पंचक्रोशीत पसरली . बिबट्याला भेटून त्याच्याशी नजरानजर करू शकले या आनंदाचा तो उत्सव नव्हता.ती एक प्रकारची अंमलबजावणी होती ...पुस्तकात शिकलेल्या धैर्याला पुस्तकातच मर्यादित ठेवायचं की प्रत्यक्षात असे प्रसंग आल्यावर 'शिवाजी जन्माला यावा पण दुसऱ्याच्या घरात' म्हणून तिथून पळ काढायचा ? अन मी ती पार पाडली होती. ...!

- भक्ती चंद्रकांत पानसरे

Comments

  1. अस्सल मराठी वाघीण... व्वा ग व्वा.... अशाच आई जिजाऊ आणि राणी लक्ष्मीबाई घरा घरात हव्यात.

    ReplyDelete
  2. खूपच सुंदर लिखाण करतेस,भक्ती

    ReplyDelete
  3. So nice no word about your handling of the situation l am proud of you well done

    ReplyDelete
  4. बापरे....खूप सुंदर लिखाण..घरी येताना काळजी घ्या..

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Taali

 Taali           खरंच कौतुक करावं वाटत , या series मधल्या प्रत्येक कलाकाराचं आणि सर्वात महत्वाचं ते म्हणजे गौरी सावंत यांची भूमिका केलेल्या सुश्मिता सेन चं ! आपल्यासमोर फक्त टाळ्या वाजवणारे आणि टोल नाक्यांवर ,रेल्वे मध्ये पैसे मागणारे म्हणून ज्यांची प्रतिमा तयार होते त्या व्यक्तीचे वैयक्तिक आयुष्य ,त्याला सोसावी लागणारी स्थित्यंतरे ...खरंच हृदय पिळवटून टाकणारी आहेत . स्त्री आणि पुरुष याच्या ही बाहेर एक नैसर्गिक जीवन आहे पण आपल्यात ते समाजमान्य नाही म्हणून जगण्याचा अधिकार च नाही का? यावरची बरीच उत्तरे 'गौरी सावंत' यांच्या प्रवासातून मिळतात . त्यांचा 'गणेश ते गौरी' हा प्रवास या समुदायाच्या जगण्याविषयी विचार करायला भाग पाडतो .       सिरीज मधले प्रसंग बघून आपल्या आजूबाजूला या घटना होत असतात ,आपण त्याकडे संवेदनशीलतेनेही बघायची तसदी घेत नाही ,त्या किती विक्षिप्त आहेत याची प्रचिती येते. या सिरीज मधला सगळ्यात जास्त टोचलेला प्रसंग तो म्हणजे, नर्गिस ची death आणि त्यानंतर फक्त dead body स्ट्रेचर वर ठेवण्यात यावी या मागणीला असंवेदनशील लोकांनी केलेला विरोध ! हे बघताना खर

तूच तुझी वैरीण

                  आज दुपारी कॉलेज वरून येताना एका ठिकाणी द्राक्षे विकत घ्यायला थांबले. द्राक्षांचा दर उतरत येत असल्याने मी ही पाडून दरात द्राक्षे मागितली .द्राक्षे विकणारी व्यक्ती या एक वयस्कर आजीबाई होत्या .उन्हाची धाप लागून त्यांना चक्कर येत होती.मी माझ्या बॅगेतली पाण्याची बाटली काढून त्यांना दिली.भर उन्हात सहन होत नसतानाही हे काम का करताय असा सहानुभूती पूर्वक प्रश्न त्यांना मी केला . "बाई पोटासाठी झिजावं लागतंय" अस त्या उत्तरल्या. कष्ट केल्याशिवाय तर आयुष्याला पर्याय नाही ,रोजीरोटीसाठी काम करणं हाच संसाराचा राहाटगाडगा यामध्ये नवल नाही पण, "आजी इतकं वय झालेलं असताना ,शरीराला झेपत नसताना का राबताय?" म्हणून विचारलं त्यावर त्या म्हणाल्या "जगत आहे तोपर्यंत माणसाने कामात गुंतवून घेतलं पाहिजे ,आमचे मालक पोरग लहान असतानाच वारले ,एकट्या पोराला घेऊन आज इथवर आले ,इकडं तिकड काम करून त्याच शिक्षण अन लग्न करून दिल,त्याच्या जबाबदारी तुन निवांत झाले पण जगण्यासाठी दोन पैसे घरात आणले पाहिजेत,मी नाही कमवल तर सून घरात आयत देणार नाही .या वयात बाहेरची परवड होणार नाही ग,त्यापेक्षा