मराठी चित्रपटांना cringe म्हणणाऱ्यांवर जबरदस्त चपराक मारणारा हा चित्रपट ! जसं की चित्रपटाच्या नावातच आहे काकस्पर्श ,नावावरून एक प्रचिती येते त्याप्रमाणे हिंदू धर्मात पिंडदानात दशक्रियेविधी दरम्यान कावळ्याच्या भूमिकेला जे महत्व आहे त्याचा संदर्भ असलेला हा चित्रपट आहे पण चित्रपट बघताना अगदी शेवटी महादेवच्या पिंडदाना वेळी झालेला काकस्पर्शाचा प्रसंग उमेचं पूर्ण आयुष्य दुःखाच्या खाईत कशा प्रकारे लोटून देतो सोबतच स्वातंत्र्य पूर्व काळात विधवा निराधार स्त्रियांची ,सन्मान सोडाच पण फक्त जगण्यासाठी झालेली ससेहोलपट या चित्रपटात जबरदस्त स्पष्ट रेखाटली आहे .
चित्रपट पाहताना खरंच प्रश्न पडतो की आज स्त्रियांना समाजात समाजाकडून जे स्वातंत्र्य मिळालं आहे त्याचा इतिहास किती भयंकर आहे . अगदी 14-15 व्या वर्षी विधवा झालेली उमा , संपूर्ण आयुष्य न मिळालेल्या लैगिंक सुखाची अनुभीती नेमकी कशी असते ही भावना घेऊन शेवटी मरून जाते. स्त्रीच्या आयुष्यात नवरा नसेल तर तीच जगणं समाजाने किती हराम करून टाकलं होतं या उमेच्या भूमिकेला अभिनेत्री प्रिया बापट ने पूर्ण न्याय दिला आहे. पूर्वीच्या काळीच्या रितींनुसार होणारी लग्न ,आणि इतर विधी ,त्यामागील समाजाची मानसिकता हे महेश मांजरेकरांनी अत्यंत चोख दिग्दर्शित केलं आहे. खरं तर चित्रपट बघताना, हरीला उमेची इतकीच काळजी वाटतेय ,तो इतकाच पुरोगामी विचारांचा आहे की त्याने उमेच्या केशवपणाला विरोध केला , ब्राह्मण सभेकडून बहिष्कार स्वीकारला तरी तो तीचा पुनर्विवाह का करत नाहीये ? असा प्रश्न प्रत्येक संवेदनशील प्रेक्षकाला पडेल ,आणि याचेच उत्तर अगदी काळजाचा ठाव घेईल असे चित्रपटाच्या शेवटी मिळते . फाटक्या तोंडाची नमू आत्या कधी खडूस वाटते तर कधी समुद्राच्या अथांगतेला टक्कर देईल अशी ममता तिच्यात दिसते ,नमू आत्या च पात्र चित्रपट बघणाऱ्या प्रत्येकाला आपलंसं करून टाकणार आहे .महादेवच्या मोठ्या भावाची भूमिका साकारताना नारळाप्रमाणे बाहेरून टणक पण आतून हळवा ,दिलेला शब्द शेवटपर्यंत पाळणारा ,उमेप्रति प्रोटेक्टिव्ह असणारा सोबतच स्वातंत्र्यसेनानी बळवंता सोबत घनिष्ठ मैत्री जपणारा अन वेळोवेळी समाजाच्या विरोधात जाऊन अक्षरशः बहिष्कार स्वीकारणारा, अशा हरी च्या भूमिकेला सचिन खेडेकरांनी पूर्णपणे न्याय दिलेला आहे .मेधा मांजरेकरांनी साकारलेली उमेच्या वहिनीची म्हणजेच हरीच्या बायकोची भूमिका ही अगदी कौतुकास्पद आहे. त्याकाळी घरातील मोठ्या स्त्रीने घर बांधून ठेवण्यासाठी कोणती कर्तव्ये पार पाडावीत याचं आदर्श उदाहरण या भूमिकेतून मांडल गेलं! घरी कोणी नसताना उमेचा आणि नमू आत्याचा झालेला संवाद प्रेक्षकांच्या हृदयाला भिडतो ! विधवा उमेला पुढच्या अखंड विधवेपणाची सत्यता कळून आधीच क्षणभर सुखासाठी आसुसलेल्या उमेच्या संपूर्ण जन्मावर समाजातील इतर पुरुषांच्या वासनेच्या नजरांची लक्तरं टांगली जातात आणि तिच्या जगण्यावर च प्रश्नचिन्ह निर्माण होतं . कदाचित समाजसुधारकांचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाला यावेळी टिळक आगरकर वादामध्ये असलेली ,आगरकरांची "आधी सामाजिक सुधारणा नंतर राजकीय" ही भूमिका जास्त पटायला लागते !
उमेचा पुनर्विवाह हरीने का केला नाही त्यामुळे विधवा उमेला ऐन तारुण्यात मानसिक आणि शारीरिक सुखासाठी आजन्म तडफडत बसावं लागण्याच उत्तर काकस्पर्शात आहे ,आणि हे सांगताना शेवटपर्यंत चित्रपटाची स्टोरी कुठेही रुळावरून घसरलेली नाही !
प्रत्येक माणसाने एकदा तरी काकस्पर्श हा चित्रपट बघावा ,जेणेकरून स्त्रियांना मिळालेल "स्वातंत्र्य" आज इथपर्यंत किती मोठा प्रवास करून आलंय याची अनुभूती येईल !

💯💯
ReplyDelete